
खासगी व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारली दोन हजाराची लाच
गोंदिया : वीज चोरीची कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम केशोरी येथील शिवाजी चौक येथील प्रवासी निवारा समोर गुरुवारी (दि.२०) ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ तंत्रज्ञ रणदीप काशीराम गोखे (४०, ईडदा-केशोरी) व मृणाल संजय ब्राह्मणकर (४०, रा. सिंगलटोली, अर्जुनी मोरगाव) असे लाचखोर आरोपींचे नाव आहे.
तक्रारदार हे शेतकरी असून तुकम-सायगाव येथे त्यांच्या आईच्या नावाने असलेल्या शेतातील बोअरवेलवर मोटारपंप चालविण्यासाठी त्यांच्या आईच्या नावाने मीटर लावले आहे. सोमवारी (दि.१७) आरोपी रणदीप गोखे याने मीटर खराब झाल्याचे सांगून जोडणी कापली. यावर तक्रारदाराने नवीन मीटरची मागणी केली असता गोखे याने तक्रारदारास तुला थेट वीज जोडणी देतो तसेच थेट जोडणी करून वीज वापरल्यामुळे वीज चोरीची कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने गुरुवारी (दि.२०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी केली असता गोखे याने पंचांसमक्ष लाचेची मागणी केली. तर त्याच्या सांगण्यावरून मृणाल भांडारकर यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. पथकाने लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेतले असून केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस निरीक्ष उमाकांत उगले, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, नायक शिपाई संतोष शेंडे, अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



