गडचिरोलीविदर्भ

कमलापूर हत्ती कॅम्पचा होणार कायापालट! ; आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन

नैनगुडम-तोंडेर रस्ता आणि पर्यटन सुविधांसाठी निधी मंजूर ; आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन हत्तींना चारली केळी

अहेरी : राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून ओळख असलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पचा आता चेहरामोहरा बदलणार आहे. अहेरीचे आमदार तथा माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गुरुवारी या परिसराला भेट देऊन सुमारे ६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी हत्तींना स्वतःच्या हाताने केळी चारून त्यांच्याशी सान्निध्य साधले.

या दौऱ्याची सुरुवात आ. आत्राम यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नैनगुडम ते तोंडेर या ५ ते ६ किलोमीटरच्या रस्त्याच्या भूमिपूजनाने केली. घनदाट जंगलातील या भागात पक्का रस्ता नसल्याने गर्भवती महिला आणि रुग्णांना बांबूच्या झोळीत टाकून दवाखान्यात न्यावे लागत असे. आ. आत्राम यांच्या पाठपुराव्यातून या रस्त्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला असून, यामुळे परिसरातील अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

शासकीय हत्ती कॅम्प परिसरात त्यांनी जवळपास एक कोटी रुपयांच्या निधीतून केल्या जाणाऱ्या विकासात्मक कामांचे भूमिपूजन केले. यात पगोड्याचे बांधकाम, पार्किंग शेडचे बांधकाम, मेन गेट ते तलावापर्यंत अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, रेपनपल्ली ते कमलापूर हत्ती कॅम्पपर्यंत जाणाऱ्या मार्गावर स्वागत कमानींसह इतर बांधकाम केले जाणार आहे. उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांना पर्यटनाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पाहणी दरम्यान आ. आत्राम यांनी हत्तींची राहणीमान स्थिती आणि त्यांच्या आरोग्याबद्दल वनविभागाकडून माहिती घेतली. त्यांनी स्वतः हत्तींना केळी खाऊ घातली आणि तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांशी संवाद साधला. “वन्यजीव संवर्धन आणि पर्यटन विकासामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सिरोंचाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक विष्णुवर्धन रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी जी.जी. गडमडे यांच्यासह माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, सरपंच रजनिता मडावी, अरुण मुक्कावार, रियाज शेख, बानय्या जनगाम, संतोष ताटीकोंडावार, महेश गुंडेटीवार, कमलापूर ग्रामपंचायतचे सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button