
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचा आढावा
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी ही जनसुनावणी होणार आहे. जनसुनावणी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता सुरू होईल. श्रीमती चाकणकर यांनी जिल्ह्यातील महिलांना न घाबरता पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन केले आहे.
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा या उद्देशाने आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत श्रीमती चाकणकर ६ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत उपस्थित राहून जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेतील आणि महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करतील.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, “राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे किंवा सुनावणीसाठी उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. या जनसुनावणीला पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्वरित कार्यवाही होऊन महिलांना दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.”
जनसुनावणीनंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांवर प्रशासन, पोलीस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण यासह विविध विभागांची आढावा बैठक देखील घेतली जाणार आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज (दि. २९ ऑक्टोबर) संबंधित यंत्रणेचा सखोल आढावा घेतला. जिल्ह्यातील महिलांशी संबंधित प्रलंबित तक्रारी व प्रकरणे तातडीने निकाली काढून तक्रार निवारणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्व विभागांनी समन्वय साधून महिलांच्या न्यायनिवाड्यासाठी प्रभावी आणि संवेदनशील पद्धतीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे तसेच इतर संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.



