भंडाराविदर्भ

3R ‘रिड्यूज, रियुज, रिसायकल’ या आंतरराष्ट्रीय फोरममध्ये भंडारा आधार शहर उपजीविका केंद्राचा सहभाग

भंडारा : राजस्थान येथे आयोजित आशिया आणि पॅसिफिक मधील 12 वा प्रादेशिक 3R ‘रिड्यूज, रियूज, रिसायकल’ या फोरममध्ये आयोजित प्रदर्शनात आधार शहर उपजीविका केंद्राला आपली उत्पादने सादर करण्याची संधी मिळाली आहे. ३ ते ५ मार्च या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक उत्पादने, तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने रिड्यूज, रियूज आणि रिसायकल (Reduce, Reuse & Recycle) या फोरमचे (मंच) आयोजन करण्यात येते. यंदा ३ मार्च ते ५ मार्च २०२५ या कालावधीत जयपूर येथील राजस्थान इंटरनॅशनल सेंटर मध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या मंचामध्ये विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी, सरकारी अधिकारी, उद्योगपती, स्टार्टअप्स आणि शाश्वत पर्यावरण विषयक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेमधील प्रदर्शनासाठी देशभरातील १५ राज्यांतील उत्कृष्ट बचत गटांची उत्पादनाची निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात भंडारा शहरात बचत गटामार्फत कागद वेस्ट पेपर चा पुनर्वापर करून सुंदर कलाकृती आणि पेपर डॉल, पेपर प्लेट, मिरर फ्रेम, वुलन झुला, वुलन फ्लॉवर व इतर नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उत्पादने बचत गट तयार करीत असुन आधार शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंची विक्री करित आहेत. त्यामध्ये भंडारा नगर परिषदेच्या आधार शहर उपजीविका केंद्र CLC सेंटरचा समावेश आहे. नगर परिषदेचे अभियान व्यवस्थापक प्रविण पडोळे, सहाय्यक गुरुदास शेंडे आधार शहर उपजीविका केंद्राचे प्रतिनिधी सीमा साखरकर, शारदा गिरेपुंजे, रंजना साखरकर या राष्ट्रीय मंचावर आपली उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. यामध्ये बचत गटाने तयार केलेल्या कलात्मक हांडमेड क्रियेटीव्ह उत्पादने मधून  महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडत आहे.

या निवडीबद्दल भंडारा नगर परिषद प्रशासनाकडून तसेच स्थानिक नागरिकांकडून आधार शहर उपजीविका केंद्राचे अभिनंदन करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील मान्यतेमुळे स्थानिक स्वयंसहाय्यता गटांना व्यावसायिक संधी मिळतील तसेच त्यांचे उत्पादन आणि कौशल्य देशभरात पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button