
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तहसीलदारांना निवेदन
गडचिरोली : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आज़मी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या विधानामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
बजरंग दल अहेरीचे जिल्हा संयोजक चंद्रशेखर पुलगाम यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, अबू आज़मी यांनी एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण करत त्याच्या अमानुष कृत्यांचे समर्थन केले आहे. हा शासक केवळ स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचा हत्यारा नव्हता, तर गुरु तेग बहादूरजी यांच्या लहान मुलांना जिवंत भितीत चिणवून मारणारा आणि हिंदूंच्या जबरदस्ती धर्मांतराचा समर्थकही होता. अशा विधानांमुळे समाजात अशांतता निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भारतीय दंड संहिता कलम 153 (A), 295 (A), 505 आणि 124 (A) अंतर्गत अबू आज़मी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, त्यांचे आमदारपद रद्द करण्यात यावे, अशीही मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
संघटनांनी इशारा दिला आहे की, जर त्वरित योग्य ती कारवाई झाली नाही, तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन समाजातील सलोखा टिकवण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तहसीलदार होनमारे यांना निवेदन देताना बजरंग दल अहेरी जिल्हा संयोजक चंद्रशेखर पुलगाम यांच्यासह समय्याजी ओल्लाला (विश्व हिंदू परिषद अहेरी जिल्हा सहमंत्री), सांबमजी सोमनपल्ली (अध्यक्ष, विहिप), मधुकर कुळमेथे (जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख), जयप्रकाश शेंडे, रामन्ना तोटावार, महेश गंजीवार, रमेश गोसकोंडा, विजय तुमडे, धर्मराज वडलाकोंडा, अनिल कुम्मरी, बंडु महाराज गावडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



