गोंदियाविदर्भ

आरोग्य सेवेत ‘डिजिटल’ क्रांती! गोंदियात RCH पोर्टल २.० आणि ‘किलकारी’ प्रशिक्षणाचे आयोजन

नागपूर विभागाचे कार्यक्रम अधिकारी उज्वल भगत यांचे मार्गदर्शन ; माता व बालकांच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

गोंदिया : प्रजनन आणि बाल आरोग्य (RCH) सेवांना अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेतील स्व. वसंतराव नाईक सभागृहात जिल्हास्तरीय एक दिवसीय आरसीएच (RCH) पोर्टल २.० व किलकारी अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. नागपूर विभागाचे राज्य कार्यक्रम अधिकारी उज्वल भगत यांनी यावेळी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

आरसीएच पोर्टल हे महिलांच्या प्रजनन जीवनचक्रात वैयक्तिक लाभार्थीची लवकर ओळख आणि ट्रॅकिंग करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ज्यामुळे माता, नवजात आणि बाल आरोग्य योजनांची अंमलबजावणी व अहवाल देणे सुलभ होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रशिक्षण अधिकारी उज्वल भगत यांनी सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पोर्टलवर नियोजनबद्ध कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले. RCH आयडी: नोंदणीकृत लाभार्थ्यांना १२-अंकी आरसीएच आयडी मिळतो, जो आरोग्य सेवा मिळवण्यासाठी आवश्यक आहे. किलकारी योजना: जिल्ह्यात ७ फेब्रुवारी २०२४ पासून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या सुरक्षेसाठी ‘किलकारी’ ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी ‘किलकारी’ योजनेची माहिती दिली. ‘किलकारी’ ही एक केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (IVR) आधारित मोबाईल आरोग्य शिक्षण सेवा आहे, जी गर्भवती महिला, नवजात माता आणि त्यांच्या कुटुंबांना प्रजनन, माता आणि बाल आरोग्याविषयी वेळेवर, अचूक आणि संबंधित माहिती प्रदान करते. ही योजना इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स तंत्रज्ञान वापरते. गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून ते मूल एक वर्षाचे (७२ आठवडे) होईपर्यंत, ज्या गंभीर कालावधीत सर्वाधिक माता आणि बालमृत्यू होतात, तोपर्यंत दर आठवड्याला प्री-रेकॉर्ड केलेला ऑडिओ कॉल सदस्यांना मराठीसह आठ भाषांमध्ये प्राप्त होतो. ‘प्रसवपूर्व, प्रसवोत्तर, प्रत्येक कुटुंबासह किलकारी’ हे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी गरोदर महिलांनी सद्यस्थितीत सुरु असलेला मोबाईल क्रमांक आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्याकडे देणे गरजेचे असल्याचे आवाहन केले. या कार्यशाळेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button