क्राईमगडचिरोलीविदर्भ

रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

मध्यरात्री रेती तस्करी ; एफडीसीएमची कारवाई

गडचिरोली : मागील काही महिन्यांपासून मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी आता वनविकास महामंडळाने पुढाकार घेतला असून ७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सौरभ गंजेवार यांनी आपल्या चमू सोबत जंगल परिसरात गस्त घालून तब्बल चार ट्रॅक्टर जप्त केले.

वनविकास महामंडळ कार्यालय, मुलचेरा अंतर्गत मुलचेरा, घोट, ठाकूरनगर आणि विक्री आगार असे चार उपक्षेत्र आहेत. यातील काही उपक्षेत्रातून मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी केली जात आहे. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सौरभ गंजेवार यांनी आपल्या चमुसोबत गस्त घालत असताना ठाकूरनगर उपक्षेत्रातील नरेंद्रपूर बिटात खंड क्रमांक ५४८ मध्ये मध्यरात्री काही ट्रॅक्टरद्वारे रेती तस्करी सुरू असल्याचे आढळताच त्यांनी रेती तस्करी करणारे तब्बल चार ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली.

जवळपास पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून घोट परिसरातील काही राजकीय व्यक्तींची ट्रॅक्टर असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विशेष म्हणजे ट्रॅक्टर सोबतच काही रेती तस्करी करणाऱ्या लोकांना देखील वनविकास महामंडळाने ताब्यात घेतल्याने ट्रॅक्टर नेमके कुणाचे याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे या भागात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सुरू असलेल्या रेती तस्करीचा मास्टरमाइंड आता समोर येणार आहे. उशिरा का होईना परंतु वन विभाग आणि महसूल विभागाने न केलेली कारवाई आता वन विकास महामंडळाने केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button