
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ व विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात ‘नली’ या एकलनाट्याने रसिकांची मने जिंकली तसेच कविता आणि शायरीच्या ‘वाहवा’ या अनोख्या मैफिलीने उपस्थितांची जबरदस्त दाद मिळवली. जळगाव येथील परिवर्तन निर्मित व योगेश पाटील दिग्दर्शित ‘नली’ हे एकलनाट्य म्हणजे साहित्य अकादमी सन्मान प्राप्त सुप्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख लिखित बाळू आणि नलीच्या निरपेक्ष प्रेमाची गोष्ट! सुप्रसिद्ध अभिनेते हर्षल पाटील यांचा सकस अभिनय नाट्य रसिकांना पूर्णवेळ गुंतवून ठेवत शेवटी मनाला चटका लावून जातो. देशमुख यांच्या कादंबरीचे नाट्यरूपांतर केले आहे ते रंगकर्मी शंभू पाटील यांनी.
शाळा-महाविद्यालयात थोड्याफार फरकाने प्रत्येकालाच अशी एक ‘नली’ भेटत असते. त्यामुळेच त्या बाळूच्या रूपात कुठेतरी आपण आपल्या स्वत:ला शोधायला आणि सापडायला लागतो.‘नली’ ही कथा नलीची आहे की बाळूची? तर याचं उत्तर आहे ‘नली’ ही कथा आहे, आपल्या समाजव्यवस्थेची. वर्षानुवर्षे चालत आलेली पुरुषप्रधान समाजव्यवस्था. आज स्त्री शिकली, सज्ञान झाली. स्वत:च्या पायावर उभी राहिली, पण ही पुरुषप्रधान समाजव्यवस्था अद्यापही अस्तित्वात आहे आणि आणखी कितीतरी वर्षे ती तशीच राहील. त्यामुळेच गावोगावी, खेडोपाडी अशा कितीतरी ‘नली’ आपल्याला आजही भेटत आहेत, भेटत राहतील. दिग्दर्शक म्हणून योगेश पाटील आणि अभिनेता म्हणून हर्षल पाटील या दोघांची मेहनत स्पष्टपणे दिसून येते, क्षणक्षणाला जाणवत राहते. त्याला मंगेश कुलकर्णी यांचं संगीत व राहुल निंबाळकरच्या प्रकाश योजनेने अधिकच सजीवता प्राप्त होते. हर्षल, संगीत आणि प्रकाश योजना ही तीनच खरंतर या एकलनाट्यातील पात्रे, पण एका परिपूर्ण अशा नाट्याची अनुभूती देऊन जाते.
या संमेलनात रसिकांना भावलेली आणखी एक मेजवानी म्हणजे अमरावती येथील प्रा. ज्ञानेश्वर गटकर आणि सचिन सुकळकर यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेलं ‘वाहवा’ ही मैफिल! या मैफिलीमधील दोघांचे काव्य सादरीकरण अविस्मरणीय ठरले. रसिकांना अंतर्मुख करणारे हे सादरीकरण होते. प्राध्यापक ज्ञानेश्वर गटकर यांची विनोदाची जाण, स्पष्टवक्तेपणा वाखाणण्याजोगा ठरला. त्यांच्या मैफिलीने तरुणांची ह्रदये काबीज केली. सूरज हेरे यांनी विनोद बुद्धीने केलेल्या समर्पक निवेदनाने वाहवाची रंगत अधिक वाढली.
गझल मुशायराने संमेलनाला साज चढला. गझलकारांनी विविध विषयांवर दर्जेदार गझला सादर केल्या आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गझल मुशायरा मध्ये अतुल ढोणे अतुल कुमार ढोणे यांनी
सांगा अजून कुठवर भोगील त्रास मुलगी
वाटेत रोज खडतर प्रवास करते मुलगी
मंगेश जनबंधू यांनी
देव मानू नये कोणालाही
एक माणूस मग कवी होतो, रोशन खलासने यांनी वेगळा आजार माझा वेगळी लस पाहिजे
काळजाला भेदणारी एक ठसठस पाहिजे
अशा गझला सादर करीत हा कार्यक्रम रंगतदार केला रत्नमाला शिंदे व गझल मुशायरा कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिकेत सोनावणे या गझलकारांनी या कार्यक्रमाची उंची वाढविली.
संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद झाले. या परिसंवादांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व मराठी भाषा या विषयावर सत्राचे अध्यक्ष पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे व डॉ. चैतन्य शिनखेडे यांच्यासह दिव्या भोसले व निलेश सोनटक्के यांनी वर्तमान काळात विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी दर्जेदार माहिती देत विषयाची मांडणी केली. अभिजात मराठी व बोलीभाषा या सत्रामध्ये अध्यक्ष मनोज मोहिते व प्रतिक्षा गुरनुले यांनी बोलीभाषेसंदर्भात दमदार मांडणी केली. अमृत बंग आणि विद्यार्थी यांचे वाचायचे का काय व कसे? या परिसंवादातून वाचन संस्कृती वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारची मांडणी केली. हे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अतिशय दर्जेदार झाले व यातून साहित्यिकांची लेखणी प्रवाही होईल आणि विद्यार्थ्यांना साहित्य विषयीची आवड निर्माण होईल अशी प्रतिक्रिया निमंत्रित साहित्यिकांनी व्यक्त केली.
विजया कांबळे यांनी सरोद वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत संमेलनामध्ये रंगत आणली.



