
अतिदुर्गम सालेकसातील आरोग्य सेवेचा घेतला आढावा
गोंदिया : अतिदुर्गम सालेकसा तालुक्यात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि योजना प्रभावीपणे राबवून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिल्या. सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य विषयक कामांचा आढावा डॉ. गोल्हार यांनी घेतला.
डॉ. गोल्हार यांनी आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की, अतिदुर्गम भागातील जनतेला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळाला पाहिजे. बैठकीमध्ये एचएमआयएस पोर्टल डाटा एन्ट्री, संशयित पोलिओ रुग्ण शोध मोहीम, माता व बाल संगोपन, सर्पदंश उपचार, सिकलसेल कार्यक्रम, कर्करोग तपासणी, नियमित लसीकरण, कुपोषण आणि नवसंजीवनी योजना यांसारख्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाबद्दल डॉ. वेदप्रकाश चौरागडे आणि किटकजन्य आजार कार्यक्रमाचा आढावा डॉ. विनोद चव्हाण यांनी घेतला.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल आणि सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले.



