गडचिरोलीविदर्भ

महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने डावलले जात असल्याची मोहरकर यांची खंत ; आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना गडचिरोली जिल्ह्यात पक्षांतराची मालिका तीव्र झाली आहे. काँग्रेस आणि भाजपमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या सत्रानंतर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत. माजी मंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मोहरकर यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून त्यांचे स्वागत केले.

प्रभाग क्र. ११ मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर प्रचारसभेत ॲड. मोहरकर यांच्यासह काही महिला-पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी मोहरकर यांनी काँग्रेस सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले. ॲड. कविता मोहरकर म्हणाल्या, “नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाही, पण महिला जिल्हाध्यक्ष असूनही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मला सातत्याने डावलले जात होते. कुठल्याही कार्यक्रमात मला बोलावले जात नव्हते आणि माझा प्रोटोकॉल पाळला जात नव्हता. नगरसेवक उमेदवारीमध्येही निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांना संधी न देता बाहेरच्या व्यक्तींवर भर दिला गेला. मला काँग्रेसच्या वरिष्ठांबद्दल आजही आदर आहे, परंतु जातीपातीचे राजकारण वाढत असल्याचे पाहून वेदना झाल्या.”

या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, रवींद्र ओल्लालवार, लिलाधर भरडकर यांच्यासह निवडणुकीतील उमेदवार उपस्थित होते. निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या या ‘इकडून तिकडे उड्या’ मुळे निवडणुकीच्या रिंगणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button