
धावपळीच्या युगात महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – सभापती आम्रपाली डोंगरवार
गोंदिया : जागतिक महिला दिन व आयुष्मान साप्ताहीक आरोग्य मेळाव्याचे औचित्य साधून ग्रामपंचायत गोठणगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन कार्यक्रम ग्रामपंचायत गोठणगाव येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती अर्जुनी मोरगावच्या सभापती आम्रपाली डोंगरवार यांचेसह ग्रामपंचायत गोठणगावचे सरपंच संजय ईस्वार, उपसरंपच कांतीलाल डोगंरवार, ग्राम पंचायत सदस्य दिपकजी राणे, सुनंदा काटेंगे, तालुका समन्वयक एस.जे. पटले, ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.धोटे तर प्राथमिक आरोग्य गोठणगावच्या वतीने जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया चव्हाण, आरोग्य सहाय्यक सुरेश पारधी व आरोग्य सहायिका अर्चना मेंढे उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारताचा इतिहास हा अत्यंत प्रतिभाशाली आणि बौद्धिक गुणांची खाण असणाऱ्या महिलांनी भरभरून पावन झालेला आहे. आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आघाडी घेवुन आपले कतृत्व सिद्ध केले आहे. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मानसिक आरोग्य ही आजच्या काळाची गरज आहे आणि तसा समुपदेशन घेणे आवश्यक आहे. आजची महिला पुरुषांपेक्षा कमी नसून प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या क्षमता ओळखाव्या आणि त्यानुसार स्वतला मोठे करण्याबाबतचे प्रेरणात्मक मार्गदर्शन आम्रपाली डोंगरवार यांनी केले.
जिल्हा आय.ई.सी.अधिकारी प्रशांत खरात यांनी महिला हे कुटुबांचे आधारस्तंभ असुन ते निरोगी राहण्याचे स्पष्ट केले. शासनातर्फे महिलांना आपल्या पायावर राहण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असुन त्याची माहिती महिलांनी करुन घेण्याचे आवाहन केले. महिलांमध्ये चुकीच्या अवेळी, अपुरा आहार व बैठ्या जीवनशैलीमुळे बरेचस्या समस्या होत असुन संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याच्या मदतीने बरेचसे विकार नियंत्रणात ठेवता येत असल्याचे स्पष्ट केले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ओळखुन विविध तपासण्या महिलांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन करुन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन अनुषंगाने तयार करण्यात आलेले महिलांसाठी आरोग्य योजना पॉम्पलेटची जनजागृती ग्रामपंचायत गोठणगाव व महिलांमार्फत करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला गोठणगावचे बचत गट, स्वंयसेविका गट, महिला मंडळ, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचेसह गावातील महिला प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.जे. पटले व आभार प्रदर्शन एन.एम. धोटे यांनी केले.



