
गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले.
मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे झालेल्या बैठकीत गोंदिया जिल्ह्यातील अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी प्रजीत नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद फरेंद्र कुत्तीरकर, मधुकर वासनिक, सत्यजित राऊत , तिलकसिंह गौतम, एस. बी. गणवीर, निलेश कानवडे व जिल्हा प्रकल्प प्रमुख राकेश हिवरे आणि विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सामान्य जनतेपर्यंत सेवा हक्क कायद्याची माहिती प्रभावीपणे पोहचविण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या परिसरात डिजिटल बोर्ड आणि वर्दळीच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावण्याची आवश्यकता असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
लोकसेवा हक्क आयोगाने विहित केलेल्या नमुन्यात सूचना फलक कार्यालयाच्या दर्शनीय भागात प्रकाशित करावेत आणि सेवा हक्क कायद्याशी संबंधित माहिती तसेच विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची यादी प्रदान करणारा क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावेत, शासकीय सेवांचा लाभ घरपोच मिळण्यासाठी वर्धा जिल्ह्यात सेवादूत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातही अशा उपक्रमाची सुरुवात करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
राज्य सेवा हक्क आयोग आणि सेवा हक्क कायद्याची माहिती जिल्हास्तरीय कार्यालयांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये सेवा हक्क कायद्यासंबंधी सूचना फलक लावावेत आणि सेवा केंद्रावर उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती नागरिकांपर्यत पोहोचवावी तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या ५३६ शासकीय सेवांचा लाभ देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. नागरिकांना सेवेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील या दृष्टीने सेवा कायद्याची प्रभावी अंमलबजाणी करावी असेही सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना त्यांच्या विभागातील प्रलंबित सेवा त्वरित निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने उपाययोजना राबविण्याचे त्यांनी सांगितले. आपले सरकार सेवा केंद्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणार बैठकीत “आपले सरकार सेवा केंद्र” उपक्रमाच्या प्रभावी अमलबजावणीवरही चर्चा झाली. जिल्ह्यात सुरु असलेले तसेच अकार्यक्षम असलेल्या व बंद असलेल्या सेवा केंद्राची तपासणी करून त्यांची कार्यक्षमता वाढवावी, तसेच ज्या ठिकाणी केंद्र नाहीत किंवा बंद आहेत तिथे नवीन केंद्र स्थापन करावीत. प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये आदर्श आपले सरकार सेवा केंद्र उभारण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना सेवा केंद्रावर मोफत अपील सुविधांबाबत माहिती द्यावी आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी आवश्यक उपायोजना कराव्यात असेही सांगण्यात आले.



