
तीन तासांत आरोपीला अटक ; सावंगी येथील घटना
गोंदिया : होळीच्या पूर्वसंध्येला आमगाव तालुक्यातील ग्राम सावंगी येथील एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी ७ वाजता उघडकीस आली. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काही अंतरावर दारू व पाण्याच्या बॉटल्स आढळून आल्या आहेत. यावरून दारूच्या नशेत भांडणातून खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नरेश लालचंद चौधरी (३५, रा. सावंगी) असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून त्याचा खून करण्यात आला असून, आरोपीला अवघ्या तीन तासांत अटक करण्यात आली आहे. परंतु अनैतिक संबंध कोणाचे ही बाब पोलिसांनी स्पष्ट केली नाही.
आमगाव तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील सावंगी मार्गावरील शेतात गुरुवारी (दि.१३) सकाळी ७ वाजता शेतकऱ्यांना शेतात एक दुचाकी व तिच्या बाजूला एक व्यक्ती पडलेला दिसला. सुरुवातीला लोकांना कुणी दारू पिऊन शेतात झोपला असावा असे वाटले व त्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. परंतु काहींनी जवळ जाऊन बघितले असता युवक मृतावस्थेत असल्याचे त्यांना कळले. त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून त्याचा खून केल्याचे लक्षात घेताच गावकऱ्यांनी ओरडा-ओरड केली. माहिती मिळताच पदमपूर व सावंगीवासीयांनी एकच गर्दी केली. सावंगी येथील नागरिकांनी येताच मृताला ओळखून नरेश चौधरी असल्याचे सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच आमगाव पोलिसाची चमू घटनास्थळी दाखल झाली. आरोपी श्रवण सोनवाने याला खुनाच्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस केली असता त्याने नरेशचा कोयत्याने खून केल्याची कबुली दिली. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु यासंदर्भात आणखी सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेसंदर्भात महेश्वरी नरेश चौधरी (३०, रा. सावंगी (चिचटोला), ता. सालेकसा) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम १०३, (१) अन्वये गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे व आमगावचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांना आरोपीचा तत्काळ शोध घेण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात आरोपी श्रवण हरिचंद सोनवाने (२५, रा. सावंगी, ता. सालेकसा) याला दुपारी सावंगी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपास वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राणे करीत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक लबडे, सहायक पोलिस निरीक्षक धिरज राजूरकर, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस उपनिरीक्षक शरद सैदाने, हवालदार राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, तुलसीदास लुटे, सुजित हलमारे, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, हंसराज भांडारकर, संतोष केदार, कुंभलवार, राम खंडारे, मुरली पांडे, आमगाव पोलिस निरीक्षक राणे, तांत्रिक सेलचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, अंमलदार रोशन येरणे यांनी केली आहे.



