
प्रतापगड बिटमधील घटना : आग विझविताना झाला मृत्यू
गोंदिया : उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात वणवा लागल्याच्या घटना सहजपणे पाहायला मिळू शकतात. मात्र, त्या वणव्याची आग विझवताना कर्तव्यावर असणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू होणे या घटना क्वचितच पाहायला मिळेल. अशीच एक घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव रेंजमधील प्रतापगड बिट परिसरातील कंपार्टमेंट २३१ आरएफ येथील जंगलात बुधवारी (दि. १२) सायंकाळी ६ ते ७वाजतादरम्यान घडली. देवबल्ली विठोबा बोरकर (५७, रा. दहेगाव माईन, ता. लाखांदूर) असे मृत वनमजुराचे नाव आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव रेंजमधील प्रतापगड बिट परिसरातील कंपार्टमेंट २३१ आरएफ येथील जंगलात बुधवारी (दि. १२) सायंकाळी वणवा पेटला होता. या वणव्याचे स्वरूप इतके भीषण होते की, ती आग विझवताना देवबल्ली बोरकर हे होरपळले. यावेळी त्यांच्याकडे आग विझविण्यासाठी पुरेसे साधन नसल्याची माहिती आहे. बोरकर यांना प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे नेण्यात आले व तेथून पुढे त्यांना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत बोरकर यांच्या परिवारास प्राथमिक स्वरूपात ४० हजारांपर्यंतची आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे, अशी माहिती सहायक उपवनसंरक्षक अविनाश मेश्राम यांनी दिली. या घटनेसंदर्भात केशोरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १३) आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास पोलिस हवालदार प्रेमदास होळी करीत आहेत.



