
कुरखेडा : संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी दुर्गम व नक्षलग्रस्त असून आकांक्षित जिल्हा आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार गडचिरोली हा राज्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या गरीब जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण नागरिक केवळ शेती व्यवसायावर अवलंबून त्यांची उपजीविका शेतीच्या उत्पन्नावर सुरू आहे. विद्युत विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत १२ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केली आहे.
पुरेसा पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नद्यांना बाराही महिने पाणी उपलब्ध राहत असल्याने शेतकरी रब्बी व खरीप हंगामात प्रामुख्याने धानपिकाची व सोबतच भाजीपाला पिकाची लागवड करतात. परंतु धानपिकाला पुरेसा पाणी होत नसल्याने धानपीक करपल्या जात आहेत. सोबतच वन्यप्राणीसुद्धा आरमोरी विधानसभा क्षेत्रात धुमाकूळ घालत असून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे, असे असतानासुद्धा शेतकरी जीव धोक्यात घालून शेतावरची मोटरपंप चालू करण्याकरिता व इतर ठिकाणी पाणी वागविण्याकरिता शेतकऱ्याला शेतात केव्हाही जावे लागत आहे. परिणामी रात्री शेतात जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा १२ तास नियमित वीजपुरवठा केल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल. करिता आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा, कोरची, वडसा या आरमोरी मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषिपंपांना विशेषबाब अंतर्गत दिवसा १२ तास वीजपुरवठा नियमित देण्यात यावा, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी कुरखेड्याचे उपविभागीय अभियंता मिथुन मुरकुटे यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व्यंकटी नागीलरवार, उल्लास देशमुख, राहुल गिरडकर व शेतकरीबांधव उपस्थित होते.



