कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी केला जात नाही, हमीभाव खड्ड्यात गेला का? – विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाहीये. कापसाची आयात केल्यामुळे बाजारात भाव पडले अशी टीका विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली. विधान सभेत प्रश्नोत्तर काळात कापसाच्या प्रश्नावरून विजय वडेट्टीवार आक्रमक झाले.
कापूस उत्पादक शेतकऱ्याचा कापूस आज ६२००-६३०० रुपयाने खरेदी केला जात आहे. सीसीआय कडून खरेदी होत नाही. भावांतर योजनेबाबत मंत्री उत्तर देत नाही. राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी आत्महत्या करत आहे आणि मंत्री गांभीर्याने या प्रश्नाकडे बघत नाही. शेतकऱ्यांना हमीभाव देणार सांगत होते, आता हमीभाव खड्ड्यात गेला का? राज्यात २००० हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मंत्री गोल गोल उत्तर देत आहेत? असा सवाल विधी मंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
यावर मंत्री जयकुमार रावल यांनी बाजारात जितका कापूस येईल तो कापूस सीसीआय खरेदी करेल. १५ मार्च पर्यंत जे शेतकरी नोंदणी करणार त्याची खरेदी करू असे आश्वासन मंत्री रावल यांनी दिले.



