कालेश्वर येथे उद्यापासून सरस्वती पुष्कर कुंभ ; लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित, सुरक्षा व्यवस्था चोख

15 ते 26 मे दरम्यान त्रिवेणी संगमावर भरणार धार्मिक मेळा ; तेलंगणा सरकारकडून युद्धपातळीवर तयारी
सिरोंचा : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या कालेश्वर येथे गुरुवार १५ मे पासून सरस्वती पुष्कर महोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पवित्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सुरक्षा उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. हा महोत्सव २६ मे पर्यंत चालणार असून, गोदावरी, प्राणहिता आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर संगमस्नानासाठी भाविक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत.
त्रिवेणी संगम असलेले कालेश्वर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथे दर १२ वर्षांनी सरस्वती नदीला येणारे पुष्कर पर्व यावर्षी साजरे होत आहे. यापूर्वी २०२२ मध्ये प्राणहिता नदी येथे पुष्कर पर्व लाभले होते. भारतीय खगोलशास्त्रानुसार बृहस्पती ग्रहाच्या राशी परिवर्तनानुसार या पवित्र नद्यांना पुष्कर काळ प्राप्त होतो. या काळात संगमस्नान, दानधर्म, अभिषेक, गोदान, प्रवचन, भजन-कीर्तन, महाआरती आणि कालेश्वरेश्वराचे दर्शन यांसारख्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या सरस्वती पुष्कर महोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, तेलंगणा सरकारने व्यापक स्तरावर नियोजन केले आहे. वाहतूक व्यवस्थापन, तात्पुरती निवास व्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, प्राथमिक उपचार केंद्रे, पिण्याच्या पाण्याची सोय, तात्पुरती शौचालये, सीसीटीव्ही यंत्रणा आणि स्वयंसेवकांची नियुक्ती यांसारख्या आवश्यक सुविधा पुरवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तेलंगणातील भूपालपल्ली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिला पोलीस, दंगा नियंत्रण पथके, सशस्त्र पोलीस, वाहतूक पोलीस, जलद प्रतिसाद दल आणि विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांची तुकडी घटनास्थळी कार्यरत आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आणि मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून, कोणत्याही अनुचित घटनेला प्रतिबंध घालण्यासाठी दृश्य देखरेख आणि गस्त वाढवण्यात आली आहे.
या महोत्सवात महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांसह परिसरातील सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, भामरागड, चंद्रपूर, बीजापूर आणि कुमूरम भीम आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. कालेश्वर येथे भरणारा हा सरस्वती पुष्कर कुंभ एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.



