भंडाराविदर्भ

महामार्गावर भीषण अपघात! ट्रक आणि बोलेरोची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, ११ जण गंभीर

आयुर्वेदिक शिबिर आटोपून परतणाऱ्या आदिवासी बांधवांवर काळाचा घाला; दोन बालकांसह जखमींवर तुमसर व भंडारा रुग्णालयात उपचार सुरू

तुमसर : तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील हसारा फाट्याजवळ असलेल्या ओम नमो ढाब्यासमोर रविवार, ३१ मे रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. धानाने भरलेला एक वेगवान ट्रक आणि बोलेरो मॅक्स पिकअप वाहनामध्ये झालेल्या समोरासमोरील जोरदार धडकेत दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन निष्पाप बालकांसह एकूण ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या भीषण अपघातात हेमलाल वरखडे (वय ५६ वर्षे) व भुता बादु सरय्याम (वय ६७ वर्षे) (दोघेही राहणार: बैतूल, मध्य प्रदेश) अशी जागीच मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. जखमींना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने तुमसर व भंडारा येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, तुमसर शहरातील राजाराम लॉन्स येथे एका आयुर्वेदिक औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शेजारील मध्य प्रदेश राज्यातील अनेक आदिवासी बांधव आले होते. हा भाविकांचा व रुग्णांचा गट शिबिर आटोपून आपल्या बोलेरो मॅक्स (क्रमांक MP-04-BC-0612) या वाहनाने गावाकडे परत जात होता. दरम्यान, खापा-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील ओम नमो ढाब्यासमोर समोरून येणाऱ्या धानाने भरलेल्या एका भरधाव ट्रकने (क्रमांक MH-31-AP-5617) बोलेरो वाहनाला भीषण धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, बोलेरो वाहनाच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. दोन्ही मृत व्यक्तींचा वाहनाच्या आतच चेंबून मृत्यू झाला, तर इतर प्रवासी आत अडकून गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच तुमसर पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मोलाच्या मदतीने जखमींना तातडीने वाहनातून बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती पाहता त्यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत, तर उर्वरित ६ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील अतिदक्षतेच्या उपचारासाठी भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

या अपघातातील जखमींमध्ये विजय भैयालाल धुर्वे (वय २८, रा. छिंदवाडा), प्रमिला अजू उईके (रा. छिंदवाडा), जयश्री पंधराम (वय २३), खुशी धुर्वे (वय ११, रा. छिंदवाडा), मिथुन वाडिया (वय २१, रा. बैतूल), सुखदेव धुर्वे (वय ३२, रा. बैतूल), उर्मिला उईके (वय ३५, रा. बैतूल), जितेंद्र धुर्वे (वय ९, रा. छिंदवाडा), सुरेश धुर्वे (वय ४६, रा. बैतूल), धनलाल धुर्वे (वय ३१), मंजुका ओडिया (वय २३, रा. मंडई) यांचा समावेश आहे.

हा अपघात नेमका कशामुळे आणि कोणाच्या चुकीमुळे घडला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणाचा सविस्तर तपास तुमसरचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मन्नाडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button