
गडचिरोली जिल्ह्यात भूमी अधिग्रहणावरून संघर्ष तीव्र; शेकडो शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्यावर घेराव, चक्काजाममुळे दोन राष्ट्रीय महामार्ग ठप्प
सकाळपासून सुरू असलेले आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिले
गडचिरोली, दि ७ ऑगस्ट : जिल्ह्यातील प्रस्तावित स्टील प्रकल्प व एमआयडीसीसाठीच्या भूमी अधिग्रहणाच्या वादाने आता उग्र रूप धारण केले आहे. ड्रोन सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रोखून धरल्याच्या प्रकरणी चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्रमांक २ येथील सात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आज आष्टी पोलीस ठाण्यावर धडक देत जोरदार घेराव घातला.
शेतकरी व ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर तीव्र घोषणाबाजी करत शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. हक्काची जमीन वाचवण्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्ह्यांच्या धाकाने गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक चिघळले. संतप्त शेतकऱ्यांनी आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे गडचिरोली–अल्लापल्ली आणि अल्लापल्ली–चंद्रपूर हे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले.
मुधोली–जैरामपूर परिसरातील तब्बल १४ गावांतील हजारो महिला, पुरुष आणि लहान मुलांनी या आंदोलनात सहभाग घेतला. “जमीन देणार नाही”, “एमआयडीसी रद्द करा” अशा घोषणांनी संपूर्ण आष्टी परिसर दणाणून गेला असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
दरम्यान, सकाळपासून सुरू असलेले आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिले. सुमारे आठ तास उलटूनही शेतकऱ्यांनी रास्ता रोको कायम ठेवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. याआधी शेतकऱ्यांनी तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनही केले होते.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, ९ जुलै रोजी झालेल्या ड्रोन सर्वेक्षणानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच योग्य मोबदला आणि संमतीशिवाय जमीन अधिग्रहित केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. “हीच जमीन आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे, ती हिरावून घेऊ नका,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी ठामपणे मांडली.
या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील भूमी अधिग्रहणाचा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासन या आंदोलनावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



