भंडाराविदर्भ

बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या ठार, ३ गंभीर

शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान; वन विभागाकडून पंचनामा, परिसरात दहशतीचे वातावरण

भंडारा : पवनी तालुक्यातील कोरंभी येथे रविवारी, १४ जून रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून प्रचंड धुमाकूळ घातला. बिबट्याने केलेल्या या रक्ताळलेल्या हल्ल्यात स्थानिक शेतकरी गुरुदास सुदामे यांच्या तब्बल ११ शेळ्या जागीच ठार झाल्या असून, ३ शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पहाटे अंदाजे २:३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे कोरंभी व परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतकरी गुरुदास सुदामे यांचे घर आणि त्यालाच लागून त्यांचा जनावरांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या शेळ्या गोठ्यात बांधून ठेवल्या होत्या. मात्र, रात्रीच्या गडद अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला आणि शेळ्यांवर एकापाठोपाठ एक जीवघेणे हल्ले चढवले. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे गोठ्यातील पशुधनाचा थरकाप उडाला. पहाटे सुदामे कुटुंबियांना हा प्रकार लक्षात आला, तोपर्यंत ११ शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या, तर ३ शेळ्या गंभीर जखमी अवस्थेत होत्या. या हल्ल्यामुळे सुदामे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची कुणकुण लागताच संपूर्ण गावात खळबळ उडाली आणि ग्रामस्थांनी गोठ्याकडे धाव घेतली. या घटनेची माहिती वन विवागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी नागदेवे व क्षेत्र सहाय्यक सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीटरक्षक डेव्हिड मेश्राम, बीटरक्षक राजाराम राठोड तसेच वन विभागाच्या ‘आर.आर.टी.’ (रॅपिड रिस्पॉन्स टीम) च्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून नुकसानीचा रीतसर मौका पंचनामा केला आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकरी गुरुदास सुदामे यांना शासन नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू केली असल्याची माहिती दिली आहे. तसेच, बिबट्याचा वावर लक्षात घेता वन विभागाने कोरंभी व परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, तसेच आपले पशुधन उघड्यावर न बांधता सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी बांधावे,” अशा सूचना वन अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, या नरभक्षक बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी कोरंभीच्या ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button