गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

संसदेत विरोधी पक्षनेते व खासदारांना बोलण्याची संधी दिली जात नाही – खा. डॉ. नामदेव किरसान यांचा आरोप

पत्रकार परिषदेत पक्षपाती धोरणावर केली टीका

गडचिरोली : सुदृढ लोकशाही ही संसदेच्या सुरळीत कार्यप्रणालीवर अवलंबून असते. संसदेचे कामकाज लोकशाही मार्गाने चालले पाहिजे. पक्षभेद विसरून सर्वांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. संसदेत विरोधी पक्षनेते व विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची पुरेशी संधी दिली जात नाही. संसदीय प्रक्रिया आणि लोकशाही मुल्याचा अवमान केला जात असल्याचा आरोप चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शनिवारी (दि.२९) गडचिरोली येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून केला. याबाबत खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्षांना भेटून लक्ष वेधण्यात आल्याची माहिती दिली.

खा. डॉ. किरसान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सभागृहात विरोधी पक्षनेते बोलण्यासाठी उभे राहिल्यावर बोलण्याची संधी देण्याची संधी देण्याची परंपरा मोडली जात आहे. हे संसदीय व्यवहाराचे उल्लंघन असून लोकशाही अधिष्ठानावर आघात आहे. विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी व खासदारांचे माईक बंद केले जातात. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुद्दे उपस्थित केले असता वारंवार त्यांचे माईक बंद करून आवाज दडपला जातो, तर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना बोलण्याची संधी दिली जाते. त्यामुळे संसदेचे स्वरूप पक्षपाती बनत आहे, असा आरोप खा. किरसान यांनी केला.

संसदीय स्थायी समित्यांच्या स्वायत्तेमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. संसदीय स्थायी समित्या स्वतंत्रपणे काम कराव्यात अशी अपेक्षा असते. मात्र अध्यक्षांच्या कार्यालयाकडून समितीच्या अहवालात बदल सुचविण्याचे प्रकार समोर आले असून ते त्यांच्या स्वायत्तेला बाधा आणत आहेत. त्याचबरोबर सल्लागार समित्यांच्या बैठका नियमीत घेतल्या जात नाही. संसदीय समित्यांबाबत पक्षपाती निर्णय घेतला जातो. वरील सर्व घटनाकम लोकशाही मुल्यांना हानी पोहचविणारे आहेत. त्यामुळे संसदेच्या कार्यक्षमतेचे संरक्षण आणि लोकशाहीच्या पारदर्शकतेला पुर्नस्थापीत करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी लोकसभा सभापतींकडे करण्यात आल्याची माहिती खा. डॉ. नामदेव किरसान यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

पत्रकार परिषदेला काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतिश विधाते, जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, विश्वजीत कोवासे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, मिलींद खोब्रागडे, रजनिकांत मोटघरे, देवाजी सोनटक्के, सालोटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button