नक्षल्यांनी केली आदिवासी वृद्धाची हत्या

भामरागडमध्ये पुन्हा एकदा नक्षल्यांची दहशत
भामरागड : तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांनी एका निरपराध आदिवासी वृद्धाची २९ मार्च रोजी मध्यरात्री गळा दाबून हत्या केली. ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या सकाळी ही घटना उजेडात आली. पुसू गिबा पुंगाटी (६०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
धोडराज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जूवी येथील पुसू पुंगाटी हा २९ मार्च रोजी लगतच्या दरबा येथे लग्न समारंभात गेला होता. नक्षल्यांनी लग्न समारंभातून पुसू पुंगाटीला उचलून नेले. ३० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह जूवी गावालगत आढळून आला. रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी त्याचा गळा दाबून हत्या केली. घटनास्थळी नक्षल पत्रक किंवा पोस्टर आढळून आले नाही. पोलिसांचा खबरी असल्याचा संशयातून ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पुसू पुंगाटी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरागड येथे आणण्यात आला असून पुढील तपास भामरागड पोलीस करीत आहेत.
छत्तीसगड सीमेलगत पेनगुंडा, नेलगुंडा आणि कवंडे येथे पोलीस मदत केंद्र स्थापन केल्याने नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाली आहे. या भागात नक्षल कारवायांवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश येत आहे. अशातच पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करत नक्षल्यांनी मागील फेब्रुवारी महिन्यात कियर येथील माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांची निर्घृण हत्या केली होती. त्यांनतर जूवी येथील एका ५२ वर्षीय आदिवासी नागरिकाची नक्षल्यांनी गळा दाबून हत्या केल्याची घटना ३० मार्च रोजी उघडकीस आल्याने परिसरात पुन्हा एकदा नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे.



