
दोन कुटुंबांचा वाद ; भद्रावतीतील थरार
भद्रावती : जुने वैमनस्य व रस्त्याच्या वादातून पाठलाग करत कुऱ्हाडीने युवकाची हत्या केल्याची थरारक घटना शुक्रवार दि. २८ रोजी रात्री ८:१५ वाजता भंगाराम वॉर्डात घडली. अमर कुळमेथे (२२) असे मृताचे नाव आहे. या घटनेत मृताचा मोठा भाऊ रोशन कुळमेथे हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी एकाला अटक केली असून, पाच आरोपी फरार झाले आहेत. वातावरण चिघळू नये, यासाठी रात्री घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, भंगाराम वॉर्ड येथील कुळमेथे या कुटुंबाशी २०११ पासून मरसकोल्हे व गेडाम या दोन कुटुंबांचा रस्त्यावरच्या जागेवरून वाद होता. परिसरात घडलेल्या घटनांमध्ये नेहमीच कुळमेथे कुटुंबाला दोषी ठरवत होते. घटनेच्या दिवशी गेडाम व मरसकोल्हे कुटुंबांनी एकत्र येऊन कुळमेथे याच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. दरम्यान, त्याच वेळेत मिस्त्री काम आटोपून अमर कुळमेथे हा घरी आला. त्याला पाहून संतापलेल्या आरोपी आकाश शिडाम, आकाश मरसकोल्हे, प्रभाकर गेडाम, प्रतीक गेडाम, शैलेश आत्राम व श्रावण आत्राम या सहा युवकांनी एकत्र येऊन पाठलाग केला व पाठीवर कुऱ्हाडीने वार करून ठार केले.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार लता वाढीवे यांनी आरोपी आकाश शिडाम याला अटक केली. आकाश मरसकोल्हे, प्रभाकर गेडाम, प्रतीक गेडाम, शैलेश आत्राम, श्रावण आत्राम हे पाच जण फरार झाल्याने त्यांचा कसून शोध सुरू आहे. वातावरण चिघळू नये, यासाठी रात्री घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.
गेडाम यांच्या कुटुंबातील एका मुलीचा घरातच पडून चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याला कारणीभूत कुळमेथे परिवार आहे, असा आरोप करण्यात आला. यातून दोन कुटुंबांत वाद झाला. त्यांच्यामुळेच मुलीचा मृत्यू झाला, असा मनात राग धरून ही हत्या झाल्याची परिसरातील नागरिकांत चर्चा आहे. घटनेच्या एका दिवसापूर्वी गेडाम कुटुंबातील एका गर्भवती महिलेला कुळमेथे कुटुंबातील एकाने पोटावर लाथ मारल्याने तिची प्रकृती बिघडली. याचाही राग होता, असेही बोलले जात आहे.



