
चंद्रपूर : पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणा राज्यात शेतमजुरीसाठी गेलेल्या जिल्ह्यातील मजुरांवर काळाने भीषण घाला घातला आहे. सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील मजुरांचे वाहन रामगुंडम येथे अपघातग्रस्त झाल्याने ३ महिलांसह एका पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तब्बल २७ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सिंदेवाहीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील मजूर दरवर्षीप्रमाणे यंदाही तेलंगणामध्ये भात रोवणीच्या कामासाठी गेले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेतातील काम आटोपून सर्व मजूर आपल्या राहत्या खोलीकडे परत जात होते. रामगुंडम परिसरात असताना त्यांच्या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अतुल वासुदेव सोनुले (वय ४५), अर्चना जनार्धन सोनुले (वय ४०), प्रभा सिताराम मोहुर्ले (वय ५६) आणि रंजना प्रभाकर शेंडे (वय ५०) यांचा समावेश आहे. या अपघातात एकूण २७ मजूर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून दरवर्षी हजारो मजूर हंगामी शेतीकामासाठी तेलंगणामध्ये स्थलांतर करतात. मात्र, कामगारांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या असुरक्षित वाहनांमुळे होणारे असे अपघात चिंतेची बाब बनले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मजुरांच्या निधनाने पवना चक गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.



