
नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेक पोस्ट परिसरात ‘नो फ्लाइंग झोन’ असतानाही, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ड्रोन उडवणाऱ्या तिघांविरुद्ध आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, ज्या दरम्यान काही नागरिकांनी संबंधित व्यक्तींना डांबून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.
९ जुलै रोजी मुधोली चेक पोस्ट परिसरात संशयास्पद ड्रोन उडताना दिसून आले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, शिवम कळोळे, सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटेवार यांच्याकडे ड्रोन उडवण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले की, चामोर्शी परिसरात भूमी संपादनाचे काम दोन महिन्यांपासून स्थगित करण्यात आले असून, सध्या कोणतीही प्रशासकीय कारवाई सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले.
“कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये; अन्यथा शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा जिल्हाधिकारी पंडा यांनी दिला आहे. सध्या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष असून नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



