
खैरी पट शेतशिवारातील घटना ; आ. नाना पटोलेंकडून सांत्वन
लाखांदूर : शेतामध्ये ओलित करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ३१ मार्चच्या पहाटे तालुक्यातील खैरी पट शेत शिवारात उघडकीस आली. डाकराम गोपीचंद देशमुख (४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील महिनाभरापासून तालुक्यातील गवराळा, डांभेविरली, टेंभरी, विहीरगाव, खैरी पट, आसोला, सावरगाव, मांदेड आदी गावातील शेत शिवारात वाघाचा संचार आहे. मागील काही दिवसांत परिसरातील तीन गावांत वाघाने पाळीव प्राण्यांची शिकार केली. नागरिकांच्या तक्रारीनंतर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. या परिसरात शेतामध्ये उन्हाळी धान पीक आहे. त्यामुळे धानाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जावेच लागते. परिसरात वाघाचा वनविभागाकडून वावर असल्याने शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अशातच, ३० मार्चच्या सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास डाकराम देशमुख हे खैरी पट शिवारातील आपल्या शेतात कृषी पंपाचे पाइप लावण्यासाठी गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी वन विभागाला सूचना देऊन रात्रीच सर्वांनी शोध सुरू केला.
दरम्यान, ३१ मार्चच्या पहाटे मक्याच्या पिकात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. शेतकऱ्याचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. दरम्यान, आमदार नाना पटोले यांच्यासह अधिकऱ्यांनी मृत शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. वन विभागाने मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ १० लाख रुपयांचा धनादेश व ५० हजार रुपयांची रोख रक्कम मदत स्वरूपात दिली. सहायक वनसंरक्षक संजय मेंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम, ठाणेदार सचिन पवार, वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने उपस्थित होते.
महिनाभरापासून वाघ शेतशिवारात भटकत असूनही वन विभागाने बंदोबस्त न केल्याने ही घटना घडली, असा आरोप करीत शेकडो गावकरी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने पोहोचत लाखांदूर वन विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा आणि मृताच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत समाविष्ट करा, ही मागणी लावून धरली.



