कोरची तहसील टी-पाईंट वळणावर खड्ड्यात अडकला ट्रक
वाहतूक कोंडी ; अपघात होण्याची शक्यता

कोरची : छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या मालवाहू ट्रक कोरची शहरातील तहसील ऑफिस टी-पॉइंट वळणावर गुरुवारी रात्री आठ वाजता दरम्यान एका मोठ्या खड्ड्यात अडकला. सदर कोरची बायपास मार्ग हा छत्तीसगड राज्याला जोडलेला आहे. या महामार्गाने २४ तास चंद्रपूर वरून रायपूर, रायपूर वरून हैदराबाद, सुरजागड वरून रायपूरला जाणारी अनेक मालवाहू ट्रकांची वाहतूक सुरू असते.
मुख्य म्हणजे, कोरची वरून गोंदिया जिल्ह्यात जाणारा हाच सरळ महामार्ग असून या मार्गावरील वळणावरच्या टि-पॉईंट तहसील बायपास मार्ग असून येथील पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात रस्त्याच्या मध्यभागी मालवाहू ट्रक अडकल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तर अनेक वाहन चालकांना जीव मुठीत घेवून वाहने बाहेर काढावी लागत आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत छत्तीसगड वरून हैदराबादला निघालेला ट्रक येथेच अडकून पडलेला होता. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
कोरची तहसील बायपास मार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी जीव घेणारे मोठं-मोठे खड्डे पडले आहेत. मागील एक वर्षापूर्वीच या रस्त्याचे नवीन बांधकाम करण्यात आले होते. परंतु सहा महिन्यातच हा बायपास रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. सध्या कोरची बायपास तहसील टी पॉईंट ते नवरगाव पुढील काही अंतरापर्यंत या रस्त्याची चाळण होऊन अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
गुरुवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक वाहनचालकांना खड्ड्याच्या अंदाज घेता येत नसल्यामुळे वाहने खड्डयात अडकत आहेत तर यापूर्वीच या मार्गावर अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे या बायपास मार्गाची संबंधित विभागाने दुरुस्ती न करता नव्याने मजबूत बांधकाम करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी यांना फोनवरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदर रस्त्याचे बांधकाम कंत्राट लक्ष्मी कन्ट्रक्शनला असून पुढील चार ते पाच दिवसात या मार्गावरील रस्त्याचे बांधकाम सुरू होणार आहे.



