
पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्हती रुग्णवाहिका; खासगी वाहनाने नेताना वाटेतच विझली प्राणज्योत, जिवती तालुक्यात तीव्र संताप
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील लक्ष्मणगुडा गावात झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने अवघ्या ६ वर्षांच्या समीर मारोती आत्राम या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी वेळेत शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला खासगी वाहनातून रुग्णालयात हलवावे लागले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने वाटेतच त्याचा अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे जिवती तालुक्यातील दुर्गम भागातील खिळखिळ्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लक्ष्मणगुडा येथील ६ वर्षीय समीर आत्राम हा नेहमीप्रमाणे रात्री आपल्या घरात झोपला होता. पहाटेच्या सुमारास एका विषारी सापाने त्याला दंश केला. सकाळी बराच वेळ झाला तरी समीर झोपेतून उठला नाही, म्हणून कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी घरामध्ये एक विषारी साप रेंगाळताना आढळून आल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने समीरला जवळच्या पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
पाटण येथील डॉक्टरांनी समीरवर प्राथमिक उपचार केले, मात्र त्याची प्रकृती कमालीची खालावल्याने त्याला तात्काळ गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात हक्काची शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. रुग्णवाहिके अभावी समीरला पुढील रुग्णालयात नेण्यास मोठा विलंब झाला. अखेर हताश झालेल्या कुटुंबीयांनी गावातील एका खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि त्याला गडचांदूरकडे नेले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उशीर झाल्याने डॉक्टरांनी तपासणी अंती समीरला मृत घोषित केले.
जिवती तालुक्यात आरोग्य सेवेच्या अभावामुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच या तालुक्यातील एका दुर्गम गावात रस्ता नसल्याने आणि वेळेत रुग्णवाहिका न पोहोचल्याने एका गर्भवती महिलेचा बाळंतपणानंतर उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला होता. ही काळीज हेलावून टाकणारी घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एका ६ वर्षीय चिमुकल्याला रुग्णवाहिका न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी तीव्र शब्दांत थुंकले आहे.
सतत घडणाऱ्या या दुर्दैवी मृत्यूंमुळे जिवती तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी भागांमध्ये आरोग्य सुविधा सक्षम करण्याची मागणी आता अत्यंत तीव्र झाली आहे. “केवळ कागदावर डिजिटल भारताच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा रुग्णवाहिका, आवश्यक औषधसाठा आणि २४ तास डॉक्टरांची उपलब्धता करून द्यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी,” अशी आग्रही मागणी लक्ष्मणगुडा येथील संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.



