गडचिरोलीतील तीन व आरमोरीतील एका प्रभागामधील निवडणुकीला ‘ब्रेक’

सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार
गडचिरोली : येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या गडचिरोली आणि आरमोरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला ऐनवेळी मोठा ‘ब्रेक’ लागला आहे. न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या अपिलांवर झालेल्या निर्णयांच्या अनुषंगाने, महाराष्ट्र नगर पालिका निवडणूक नियम १९६६ च्या नियम १७(१)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने, गडचिरोलीतील तीन आणि आरमोरीतील एक, अशा एकूण चार प्रभागांमधील निवडणुकीला जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे.
जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिलेल्या आदेशानुसार, गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १(अ), प्रभाग क्रमांक ४(ब), प्रभाग क्रमांक ११(ब) व आरमोरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १०(अ) मधील निवडणूक तूर्तास थांबविण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, ज्या जागांवर दाखल करण्यात आलेल्या अपिलांचे निकाल २२ नोव्हेंबर २०२५ नंतर लागले आहेत, अशा जागांसाठी ४ नोव्हेंबरच्या कार्यक्रमानुसार निवडणूक घेऊ नये, असे निर्देश आयोगाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दिले. या निर्देशांचे पालन करत जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी संबंधित चार प्रभागांमधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे माहिती देण्यात आली आहे की, या चारही प्रभागांमधील निवडणूक आता सुधारित कार्यक्रमांनुसार घेण्यात येतील. त्यामुळे मतदारांना आणि उमेदवारांना सुधारित तारखांची वाट पाहावी लागणार आहे.



