गडचिरोलीविदर्भ

मेंढा (लेखा) ग्रामसभेत जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवला सहभाग

स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचे केले निरीक्षण

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) या आदर्श ग्रामसभेला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी (दि.११) भेट दिली. या भेटीत त्यांनी ग्रामसभा सदस्यांशी थेट संवाद साधला आणि प्रत्यक्ष ग्रामसभेत सहभागी होत स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचे निरीक्षण केले. जिल्हाधिकारी यांनी एकल सेंटरमार्फत स्थानिक युवकांना ‘बेअरफुट टेक्नीशियन’ म्हणून प्रशिक्षण देण्याची व रोजगार हमी योजनेंतर्गत त्यांच्याकडून कामे घेण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामसभा अध्यक्ष देवाजी तोफा यांनी गावाच्या आणि ग्रामसभेच्या कामकाजाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 27 एप्रिल 2011 रोजी मेंढा (लेखा) ग्रामसभेला बांस विक्रीसाठी T.P. (ट्रांझिट पास) देऊन वनहक्क मान्यतेचा इतिहास घडला होता. आज या ग्रामसभेला एकूण 1800 हेक्टर सामुहिक वनहक्क मिळाले असून, यापैकी 300 हेक्टर क्षेत्रात मनरेगा अंतर्गत कामे सुरू आहेत. उर्वरित 1500 हेक्टर जंगल क्षेत्राचे संवर्धन ग्रामसभा करत आहे.

ग्रामसभेतील एकाही नागरिकावर पोलिस केस नाही, निवडणुका बिनविरोध होतात, महिलांचा सहभाग लक्षणीय आहे आणि गावात लोकशाही मूल्यांवर आधारित पारदर्शक निर्णयप्रक्रिया राबवली जाते. गावकऱ्यांच्या मते, “दिल्ली-मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार” हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. ग्रामसभा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असून सरकारी योजनांपेक्षा ग्रामस्तरावरच योजना बनवून अंमलबजावणी केली जाते.

ग्रामसभेच्या नोंदणीकृत कामांमध्ये बांबू लागवड, वनतलाव खोलीकरण, मिश्र रोपवाटिका इत्यादींचा समावेश असून, गौण वनोपजाच्या थेट खरेदीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे दिसून येते.

यावेळी महिला महाविद्यालय गडचिरोलीचे प्रा. कुंदन दुपारे, समाजकार्य महाविद्यालय गडचिरोलीचे प्रा. भूपेंद्र गौर, जिल्हा परिवर्तन समिती गडचिरोलीचे टेक्निकल ऑफिसर गणेश ठावरे, नोडल अधिकारी सतीश राजू वड, लघुलेखक सिताराम नागोबाजी बुरे, ग्रामपंचायत मेंढा यांच्या सरपंच नंदताई दुगा, एकल सेंटरचे समन्वयक निलेश देसाई व चंद्रकांत किचक, तालुका महाग्रामसभा अध्यक्ष बाजीराव नरोटे, ग्रामसभा मांळदाचे अध्यक्ष कृष्ण भुरखुरिया आणि रोहयो, धानोरा येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती किरण गज्जलवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button