
लाखांदूर तालुक्यातील तावशी येथील घटना
भंडारा : सततची नापिकीमुळे बँक, सोसायटीमधून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. या मानसिक विवंचनेतून एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने घरीच लाकडी मयालीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील तावशी येथे १० एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. नितीन देवचंद राखडे रा. तावशी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
नितीनने स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. वडील स्वयंपाक खोलीत गेले असता, त्याला गळफास लागलेल्या अवस्थेत नितीन आढळला. नितीन हा अल्पभूधारक शेतकरी असून, त्याच्याकडे दीड एकर शेती आहे. त्याने दोन वर्षापूर्वी बँक व सोसायटीकडून कर्ज घेतले होते. पुन्हा उधार उसने करून रब्बी धान पिकाची लागवड केली. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतीला सिंचन करणे शक्य नव्हते. वातावरण बदलाचाही शेतपिकाला फटका बसल्याने रोगराईने धान पीकही फस्त झाले. त्यामुळेघेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची. या विवंचनेत होता अशी माहिती सुत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. नितीनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. तपास दिघोरी पोलिस करीत आहे.



