कृषीगडचिरोलीविदर्भ

‘भारत-विस्तार’मुळे शेती आता होणार हायटेक; कृषी विज्ञान केंद्रात जनजागृती कार्यक्रम

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते शुभारंभ ; १५५२६१ हेल्पलाईनवर ‘भारती’ एआय सहाय्यक करणार चोवीस तास मार्गदर्शन

गडचिरोली : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘भारत-विस्तार’ हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना घरबसल्या शास्त्रोक्त सल्ला मिळणार आहे. या संदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत सोनापूर-गडचिरोली येथे जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

राज्य कृषी व्यवस्थापन संस्था (SIAM), जयपूर येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मचा नुकताच शुभारंभ झाला. गडचिरोली येथील कार्यक्रमात या सोहळ्याचे आभासी (Virtual) प्रक्षेपण करण्यात आले. ‘भारत-विस्तार’चा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना २४ तास आणि सातही दिवस अचूक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना आता महागड्या स्मार्टफोनची गरज भासणार नाही. हेल्पलाईन क्रमांक: १५५२६१ वर कॉल करून शेतकरी थेट संवाद साधू शकतात. एआय सहाय्यक: ‘भारती’ नावाची एआय सहाय्यक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना स्थानिक भाषेत उत्तरे देईल. मिळणारी माहिती: हवामान अंदाज, पीक नियोजन, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि बाजारभाव यांसारखी महत्त्वाची माहिती एका कॉलवर उपलब्ध होणार आहे.

“भारत-विस्तार प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शास्त्रोक्त माहिती मिळवण्यासाठी आता शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. यामुळे उत्पादन खर्चात घट होऊन शेतकऱ्यांची निर्णयक्षमता वाढेल,” असा विश्वास कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोलीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘भारत-विस्तार’ प्लॅटफॉर्म कसा वापरावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी गणेश गणविर (प्रभारी सहयोगी प्राध्यापक, कृषी संशोधन केंद्र), विषय विशेषज्ञ डॉ. विक्रम एस. कदम, सुचित लाकडे, डॉ. प्रितम एन. चिरडे, ज्ञानेश्वर ताथोड, नरेश बुद्धेवार, डॉ. रविंद्र करंगामी, प्रविण लहाने, दिपक चव्हाण, सुनिता थोटे, मोहीतकुमार गणविर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात डिजिटल कृषी उपक्रमाची ही प्रभावी अंमलबजावणी कृषी क्षेत्रासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button