गडचिरोलीविदर्भ

‘प्रोजेक्ट उडाण’च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा सराव पेपरचे आयोजन 

३४०० विद्यार्थ्यांनी दिला सराव पेपर ; जिद्द, चिकाटी व मेहनतीनेच यश मिळू शकते – पोलीस अधीक्षक नीलोत्पल

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांला योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत. करीता शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परिक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण” अंतर्गत काही दिवसांनी सुरु होणाऱ्या स्पर्धा परिक्षेच्या पार्श्वभूमीवर १९ एप्रिल रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहिद पांडु आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रत्येक वाचनालयामध्ये मोफत स्पर्धा परिक्षा सराव पेपर क्र. ०५ टेस्ट सिरीज चे आयोजन करण्यात आले. याचा उपयोग विद्यार्थ्यांना येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, वनरक्षक संयुक्त परीक्षा तसेच विविध स्पर्धा परिक्षेकरिता होणार आहे.

पोलीस मुख्यालय व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमके स्तरावरुन एकूण ३४०० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतीसाद दिला. तसेच विशेष बाब म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस स्टेशन पेनगुंडा हद्दीतील १५ विद्याव्यांनीही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहिद पांडु आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरला उपस्थित ११०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीनेच यश मिळू शकते. विद्यार्थ्यांनी येणाऱ्या परिक्षांकरिता सातत्यपूर्ण चिकाटीने अभ्यास करावा व या सराव परिक्षेच्या माध्यमातून आपला अभ्यास किती झाला आहे, याची तपासणी करुन पाहावी. भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांकरीता आत्तापासूनच तयारीला लागावे. तसेच तुमची स्पर्धा ही स्वतः बरोबर असून या स्पर्धा परिक्षेमध्ये मेहनत घेऊन यशस्वी होऊन आपल्या कुटुंबियाचे नाव लौकिक करावे. जिल्ह्यामध्ये होतकरु विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना उचित व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल आहे. या व्यतिरीक्त पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्किलींग इन्स्टीट्यूट मार्फत सुरु असणारे सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर व मिडीया डेव्हलपर कोर्सेस बाबत माहिती दिली.

या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button