क्राईमभंडाराविदर्भ

सट्टा रॅकेटचा पर्दाफाश ; सहा जणांना अटक

१ लाख १४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

तुमसर : शहरातील हनुमान नगर परिसरात सुरू असलेल्या सट्टा मटक्याच्या मुख्य अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध सट्टा रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सहा जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून, १ लाख १४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

तुमसर शहर व तालुक्यात सट्टा मटक्याचे व्यवहार अनेक पातळ्यांवर विभागले गेले आहेत. परिसरातील विविध भागात लपूनछपून काम करणारे लहान स्तरावरील सट्टापट्टीवाले नागरिकांकडून आकडे लिहून घेतात. नंतर हे सर्व आकडे मुख्य खायवालच्या अड्ड्यावर सुपूर्द केले जातात. अशाच एका मुख्य सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

यात योगेंद्र देविदास येळणे (३७, रा. राजेंद्र नगर), अनिल ताराचंद हेडाऊ (४८, रा. सरदार वॉर्ड), नीलेश शिवकुमार साठवणे (३२, गांधी वॉर्ड), विजय गंगाधर रामटेके (४५, रा. गांधी वॉर्ड), राजेश डोमाजी मदनकर (४९, रा. हनुमान नगर), संजय हंसराज साठवणे (३२, रा. गोवर्धन नगर) हे सर्व आरोपी तुमसर शहरातील रहिवासी आहेत.

पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुधे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी ४:३० ते ६:३० यादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गोपाल बारई यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून सट्टा मटक्याचा व्यवहार सुरू असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून धाड टाकली. ते सट्टा आकडे लिहून त्यावर जुगाराच्या आकड्यांचा हिशोब करत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल, प्रिंटर, दोन कॅल्क्युलेटर, सट्टा आकडे लिहिलेले कागद, हिशोब रजिस्टर, रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विजय पंचबुधे, सहायक पोलिस निरीक्षक गौतम, हेडकॉन्स्टेबल भोंडेकर, रवी आडे, उमेश सार्वे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button