गडचिरोलीविदर्भ

आदिवासी विद्यार्थिनींच्या न्यायासाठी बेमुदत आंदोलन

डीबीटीद्वारे विद्यार्थीनींच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसूल करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी ; भाग्यश्री आत्राम यांची आंदोलनस्थळी भेट

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील शासकीय अनुदानित जाती नवबौद्ध निवासी शाळेतील विद्यार्थिनींना गणेशाकरिता डीबीटीद्वारे प्रत्येक विद्यार्थीनींच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसूल करणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकावर कारवाई करीत विद्यार्थिनींच्या खात्यात रक्कम वळती करावी, या मागणीला घेऊन राकाँच्या (शरद पवार गट) वतीने सोमवारी (दि.21) तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण पुकारण्यात आले.

सिरोंचा तालुक्यातील शासकीय अनु. जाती नवबौद्ध निवासी शाळेतील विद्यार्थिनींना गणवेशाकरिता शासनाकडून डीबीटीद्वारे प्रत्येक विद्यार्थिनीला 3082 रुपयांप्रमाणे रक्कम खात्यात जमा करण्यात आली. मात्र, सदर शाळेतील मुख्याध्यापक (बोरवार) यांनी विद्यार्थिनींकडून खात्यातील पैसे वसूल करण्यात आले. सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृह व निवासी शाळेतील विद्यार्थिनींना वस्तुस्वरूप वस्तू न देता थेट डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात आधार संलग्न पैसे जमा करण्याचे आदेश आहे. मात्र, या शासन निर्णयाची पायमल्ली करीत विद्यार्थिनींच्या खात्यातील रक्कम परत मागवून त्यांची आर्थिक शोषण करण्यात आले. याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करीत विद्यार्थिनींची रक्कम परत करावी, या मागणीला घेऊन राकाँच्या नेतृत्वात तहसील प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, 15 दिवसांचा कालावधी लोटूनही कारवाई न झाल्याने राकाँचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सागर मूलकला, चोक्कामवार यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण पुकारण्यात आले. यावेळी राकाँ नेत्या तथा माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनीही आंदोलनात सहभागी होत तहसिलदारांना उपोषणस्थळी बोलावून चर्चा केली. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button