जहाल नक्षलवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, १० लाखांचे होते बक्षीस
१० लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले

गडचिरोली : १० लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. भामरागड दलम कमांडर वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु (वय २७) रा. पिडमिली ता. चिंतागुफा, जि. सुकमा (छ.ग.) व त्याची पत्नी भामरागड दलम सदस्य रोशनी विज्या वाचामी (वय २४) रा. मल्लमपोड्डर, ता. भामरागड यांनी १४ ऑक्टोबर रोजी आत्मसमर्पण केले.
शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६७४ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
राज्य शासनाने आत्मसमर्पित नक्षलवादी वरुण मुचाकी वर एकूण ०८ लाखांचे आणि रोशनी वाचामी वर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. वरुण मुचाकी हा २०१५ मध्ये कोंटा एरीया मध्ये सदस्य पदावर भरती झाला. त्यानंतर त्याने २०१५ ते २०२० पर्यंत डीकेएसझेडसी गिरीधर तुमरेटी याचा अंगरक्षक म्हणून काम केले. तसेच नोव्हेंबर २०२० ते २०२२ पर्यंत भामरागड दलम मध्ये बदली होऊन उपकमांडर पदावर काम केले. २०२२ ते आजपावेतो भामरागड दलममध्ये दलम कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्याविरुद्ध एकुण १५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १० चकमक व ०५ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
रोशनी वाचामी ही २०१५ मध्ये राही दलममध्ये दाखल झाली. त्यानंतर २०१६ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन २०१७ पर्यंत कार्यरत होती. १०१७ मध्ये अहेरी दलममध्ये बदली होऊन २०१९ पर्यंत कार्यरत. २०१९ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन २०२१ पर्यंत कार्यरत. २०२१ मध्ये गट्टा दलममध्ये बदली होऊन सन २०२२ पर्यंत कार्यरत. २०२२ मध्ये परत भामरागड दलममध्ये बदली होऊन आजपावेतो पार्टी मेंबर पदावर कार्यरत होती. तिच्याविरुद्ध एकुण २३ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १३ चकमक, इतर १० गुन्ह्यांचा समावेश आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन वरुण मुचाकी याला ५.५ लाख तर रोशनी वाचामी हिला एकुण ४.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती-पत्नी असलेले नक्षलवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून १.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे, असे एकुण ११.५ लाख रुपयांचे बक्षिस शासनाकडुन जाहिर करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण २७ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
सदर नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व कमांण्डट ३७ बटा. सिआरपीएफ दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.



