
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांची नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषदेच्या राष्ट्रीय महासचिव पदी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद नवी दिल्लीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व या कार्यात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींची निवड केली जात असते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण जी मांगरिया यांनी डॉ. देवराव होळी यांची नियुक्ती करीत असल्याचे पत्र प्रसिद्ध केले. डॉ. होळी यांची निवड झाल्याचे कळताच संघटनेच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.



