
सोनेगाव शिवारातील घटना ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गोंदिया : शेतातील कामे आटोपून घरी परतणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर रानगव्याने अचानक हल्ला चढवल्याची घटना रविवारी (दि. ४) सकाळी गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव शिवारात घडली. या हल्ल्यात एका ५७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांचा सोबती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सोनेगाव येथील रहिवासी नीलकंठ नंदलाल तुरकर (५७) हे रविवारी सकाळी सोनेगाव ते शहारवाणी दरम्यान असलेल्या त्यांच्या शेतात जनावरांना पाणी देण्यासाठी आणि शेतीकामासाठी गेले होते. काम आटोपून घरी परतत असताना, झुडपी जंगलात दबा धरून बसलेल्या रानगव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. रानगव्याने नीलकंठ यांच्या पोटात शिंग खुपसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी नीलकंठ यांच्यासोबत असलेले सीताराम मयाराम पटले (६०) यांच्यावरही रानगव्याने हल्ला चढवला. मात्र, त्याच वेळी दुचाकीने जात असलेले तेजराम ठाकरे यांनी प्रसंगावधान राखून मोठा आरडाओरडा केला. यामुळे रानगवा जंगलाच्या दिशेने पळून गेला आणि सीताराम पटले यांचा जीव थोडक्यात वाचला. जखमी सीताराम पटले यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बोदलकसा बीटचे वनरक्षक पटले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा रानगवा आता चिचगातटोला आणि कवलेवाडा परिसराच्या दिशेने गेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे सत्र वाढले आहे. जिल्ह्यात यापूर्वी बिबट्याने अनेकांचे बळी घेतल्याने खळबळ उडाली होती. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात मर्यादित असलेला वन्यप्राण्यांचा उपद्रव आता इतर तालुक्यांतही पोहोचला आहे.
शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मोठी मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. “शेतात जायचे कसे आणि कामे करायची कशी?” असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.



