
पावसाळ्यात मार्ग बंद होण्याची भीती ; प्रशासनाच्या कायमस्वरूपी दुरुस्तीकडे दुर्लक्ष
कोरची : तालुक्यातील कोचीनारा मार्गावरील पुलावर मोठमोठे भगदाड पडले असून, वारंवार अपघात घडत आहेत. प्रत्येक वेळी केवळ मुरूम अंथरून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने, प्रशासन या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी करणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. यापूर्वी प्रशासनाने दखल न घेतल्याने स्थानिक नागरिकांनी स्वखर्चाने पुलावर पडलेले खड्डे मुरूम-माती टाकून बुजवले होते. मात्र, पावसाळ्यात हा मुरूम वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा मोठा खड्डा पडून अपघात होण्याची शक्यता वाढते. यामुळे प्रवाशांना जीवघेण्या अपघातांचा सामना करावा लागत आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद होतो. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात येथे मोठा अडथळा निर्माण होतो. मात्र, पुलाची उंची वाढविण्यासह दुरुस्ती कामाला सातत्याने विलंब होत आहे. या गंभीर समस्येबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता बी. सी. धार्मिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.



