गडचिरोलीविदर्भ

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी कार्यशाळा सुरू ; मिळणार नीट-जेईई प्रशिक्षणाची संधी

अहेरी येथे लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट संस्थेचा उपक्रम

अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी आणि लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट, पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत दहावी उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वीस दिवसांच्या निवासी कार्यशाळेचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यशाळेत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड आणि गडचिरोली प्रकल्पांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी डी. के. कस्तुरे यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक राजेश दुर्गे होते. याप्रसंगी उच्च माध्यमिक शिक्षक एम.के. बल्की, डी.डी. भोंगळे, तसेच तज्ञ मार्गदर्शक डॉ. सुबोध कळमणुरीकर, डॉ. ओमराज पॉल, डॉ. शिवम काळेकर, डॉ. श्रवण वेलादी आणि डॉ. ओमकार बिलवले आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात डी. के. कस्तुरे म्हणाले की, समाजातील वंचित, उपेक्षित आणि आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) आणि जेईई (JEE) सारख्या महागड्या कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते. लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट या संस्थेच्या माध्यमातून अशा दुर्गम भागातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत फाउंडेशन कोर्स आणि मूलभूत ज्ञान देण्याची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे आणि डॉक्टर झाल्यावर आपल्या दुर्गम भागात सेवा द्यावी, अशी अपेक्षा आहे.

यावेळी संस्थेच्या वतीने बोलताना डॉ. ओम दिवटे यांनी सांगितले की, २०१५ ते २०२१ या काळात संस्थेच्या प्रयत्नातून अनेक विद्यार्थ्यांनी एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस. आणि बी.डी.एस. मध्ये प्रवेश मिळवला आहे. संस्थेचा मानस २०३५ पर्यंत आणखी १०० तळागाळातील विद्यार्थी एम.बी.बी.एस. व्हावेत असा आहे. कार्यशाळेनंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन पुढील प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे यशस्वी संचालन जी.आर. बोकडे यांनी केले. याप्रसंगी आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध आश्रमशाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button