गडचिरोलीविदर्भ

हळद सुकण्यापूर्वीच नवरदेवाची प्राणज्योत मालवली ; नववधूच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

गहाणेगाटा येथील हृदयद्रावक घटना ; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू

गडचिरोली : वडिलांचे पितृछत्र आधीच हरपलेले, एकट्या आईला खूप काम करावे लागतात म्हणून मुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न आणि स्वागत समारंभही आटोपला. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अचानक प्रकृती बिघडली आणि हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकवत नवरदेवाचा मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगाटा येथे आज घडली. नारायण कंवलसिंह बोगा (२६) असे मृत नवविवाहित युवकाचे नाव आहे.

नारायण हा साधा आणि मनमिळाऊ स्वभावचा होता. १५ वर्षांपूर्वी त्याचे वडील वारले. तेव्हापासून तो आणि त्याची आई दोघेच घरी राहत होते. आईने खूप कष्ट करून त्याला वाढवले होते. त्यामुळे आपल्या आईच्या मदतीला चांगली सून आणावी, असे त्याला नेहमी वाटत असे. याच विचारातून त्याने यावर्षी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आईने छत्तीसगड राज्यातील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरुराम कुमेटी यांची मुलगी दीपिका हिच्याशी ३० एप्रिल रोजी पारंपरिक पद्धतीने त्याचे लग्न जुळवले.

१ मे रोजी नारायणच्या गावी धुमधडाक्यात स्वागत समारंभ पार पडला. मात्र, लग्नाच्या दिवशी नारायणने आपल्या नातेवाईकांना पोटात दुखत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी त्याने बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले आणि त्याला बरेही वाटले. परंतु शुक्रवारी पुन्हा त्याच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तो स्वतःच मोटारसायकल चालवत मित्र आणि पत्नी दीपिकाला घेऊन वासळी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला.

परंतु, बोरी गावाजवळ पोहोचताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्याने तात्काळ मोटारसायकल थांबवली आणि पत्नी दीपिकाच्या मांडीवर डोके ठेवले. काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गहाणेगाटा गावात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे. ज्या घरात काही दिवसांपूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button