
गोंदिया : तालुक्यातील गोर्रे येथे शुक्रवारी (दि. २) दुपारी १२ वाजेच्या सुमारास कालव्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुण मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रशांत नरेंद्र पटले (वय २१) आणि प्रतीक दौलत बिसेन (वय २१, रा. गोर्रे) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित बिसेन (वय १८), प्रशांत पटले आणि प्रतीक बिसेन हे तीन मित्र होते. प्रतीक हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता, तर प्रशांत सालेकसा येथील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता. प्रतीक सुट्ट्यांमध्ये गोर्रे येथे आला होता. शुक्रवारी दुपारी १२ वाजता तो प्रशांत आणि सुमितला घेऊन पुजारीटोला धरणाच्या मध्य प्रदेशच्या दिशेकडील मोठ्या कालव्यात अंघोळीसाठी गेला होता.
कालव्यात अंघोळ करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे प्रशांत आणि प्रतीक हे दोघेही पाण्यात वाहून जाऊ लागले. त्यांना वाचवण्यासाठी सुमितनेही कालव्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने तोही वाहू लागला. सुदैवाने, त्याने कालव्यातील एका झाडाला पकडले आणि मोठ्या प्रयत्नानंतर तो स्वतःला बाहेर काढण्यात यशस्वी झाला.
या घटनेनंतर सुमितने तातडीने गोर्रे गावात धाव घेऊन आपले दोन्ही मित्र कालव्यात वाहून गेल्याची माहिती दिली. ही बातमी कळताच दोन्ही तरुणांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी कालव्याच्या दिशेने धाव घेतली. तसेच, घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून कालव्यात शोधमोहीम सुरू केली. प्रतीक आणि प्रशांतचा शोध घेण्यासाठी गोंदिया येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकालाही बोलावण्यात आले होते. सायंकाळी सुमारे ६:३० वाजता घटनास्थळापासून दोनशे मीटर अंतरावर प्रशांत आणि प्रतीकचे मृतदेह सापडले.
आपल्या मुलांचे मृतदेह पाहून दोन्ही कुटुंबांनी एकच आक्रोश केला. या दु:खद दृश्याने घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. या दुर्घटनेमुळे गोर्रे गावावर शोककळा पसरली आहे.



