
मोहाडी : तालुक्यातील पिंपळगाव (कान्ह.) येथे राजकीय द्वेषातून उपसरपंचाने ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून सुरू असलेल्या कचरा विलगीकरण कामाचे शासकीय बांधकाम पाडले. याप्रकरणी सरपंचासह गावकऱ्यांनी उपसरपंचावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ग्रामपंचायत पिंपळगाव (कान्ह.) च्या वतीने कान्हळगाव रस्त्यावर कचरा विलगीकरणाचे काम सुरू होते. उपसरपंच उमेश रामदास उपरकर आणि विजय सखाराम चोपकर यांनी या कामाला विरोध केला होता. २४ एप्रिल रोजी दोघांनी घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले आणि पुन्हा काम सुरू केल्यास तोडफोड करण्याची धमकी दिली होती. मात्र, सरपंच रेखा ज्ञानेश्वर गभणे आणि इतर सदस्यांनी मध्यस्थी करत काम सुरू ठेवण्यास सांगितले होते.
दरम्यान, उपसरपंचांनी २५ एप्रिल रोजी काही वृत्तपत्रांमध्ये सरपंच आणि सचिव मनमानी करत असल्याचा आरोप करणारे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर २९ एप्रिलच्या रात्री उपसरपंच उमेश उपरकर आणि विजय चोपकर यांनी संगनमत करून कचरा विलगीकरण शेडची तोडफोड करत ते जमीनदोस्त केले. ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी काम करणाऱ्या मजूर आणि गावकऱ्यांच्या लक्षात आली.
शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेत या विषयावर चर्चा सुरू असताना, उपसरपंच उमेश उपरकर आणि सदस्य विजय चोपकर यांनी, ‘ते शेड आम्हीच पाडले आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करा,’ अशी धमकी सरपंच, ग्रामसेवक आणि इतर सदस्यांना दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सरपंच आणि सचिवांसह सर्व सदस्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी उपसरपंच उमेश रामदास उपरकर आणि सदस्य विजय सखाराम चोपकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४ (४) व कलम ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणणे आणि शासकीय संपत्तीची नासधूस करणे या कलमांन्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे.



