चंद्रपूरविदर्भ

वन विभागात आगीचे सत्र कायम ; वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वाहनाने घेतला पेट

भद्रावती : येथील वन परिक्षेत्र कार्यालयात आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. १२ एप्रिलपासून सुरू असलेल्या आगीच्या मालिकेत रविवारी (दि. ४) रात्री ९:३० वाजता कार्यालयातील एका वाहनाने अचानक पेट घेतला. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.

आगीची ही घटना क्षेत्र सहायक विकास शिंदे यांच्याशी संबंधित आहे. यापूर्वी त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे आणि इतर साहित्य यांनाही आग लागली होती. वाहन पेटल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले, मात्र वेळेवर मदत न पोहोचल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत एमएच ३२-५४३७ क्रमांकाचे वाहन जळून पूर्णपणे नष्ट झाले होते.

वन परिक्षेत्र कार्यालयात आग लागण्याच्या घटना १२ एप्रिलपासून सुरू आहेत. पहिल्या घटनेत वनविभागाच्या गोडाउनला आग लागली होती, त्यानंतरही अशा घटना घडल्याची चर्चा आहे. आतापर्यंत लागलेल्या आगीत लाकूड, कार्यालयातील रेकॉर्ड रूममधील महत्त्वाची कागदपत्रे, फाइल्स, सिमेंट बॅग आणि ऑइल पेंटचे डबे व ब्रश जळून खाक झाले आहेत.

या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अज्ञात कारणांमुळे वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे वन विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button