
शेकडो निराधार आणि शेतकऱ्यांचा सहभाग ; विविध मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
आरमोरी : संजय गांधी, श्रावणबाळ आणि इतर निराधार योजनेतील अर्थसहाय्याची रक्कम मासिक ५ हजार रुपये करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कॉ. अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.०८) आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोर शेकडो निराधारांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मार्गदर्शन करताना कॉ. अमोल मारकवार म्हणाले की, सरकार भांडवलदारांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करते, मात्र गरजूंना मदत करण्यासाठी तिजोरीत पैसे नाहीत, असे सांगून टाळाटाळ करत आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी सांगितले की, निराधार योजनेची रक्कम ५ हजार रुपये करण्याची चळवळ संपूर्ण राज्यभर उभी करून ती विधानमंडळाच्या दारापर्यंत नेली जाईल.
आंदोलनात संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ द्यावा, महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ रद्द करावे, तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांची मजुरी त्वरित द्यावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर, शालेय स्वयंपाकी, रोजगार सेवक या असंघटित कामगारांना मासिक २६ हजार रुपये वेतन आणि ५ हजार रुपये मासिक पेन्शन द्यावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, बेघर लोकांना घर बांधकामासाठी ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य द्यावे व जागा नसलेल्यांना जागा द्यावी, जबरानजोत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे द्यावे, आरमोरी नगर परिषद अंतर्गत रोजगार हमीची कामे सुरू करावी, हत्तीने नुकसान केलेल्या पिकांसाठी एकरी ७५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान द्यावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी द्यावा, धान बोनस त्वरित जमा करावा, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी, आरमोरी शहरात नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागण्यांचा समावेश होता.
या ठिय्या आंदोलनात मारोती गुरुनुले, मनसेच्या विभा बोबाटे, ज्योती सहारे, माकपचे तालुका सचिव कॉ. राजू सातपुते, कॉ. विठ्ठल प्रधान, माणिक कुर्वे, यशवंत नारनवरे, अर्चना मारकवार, मायाताई सिंदी, भगवान राऊत, किसन राऊत, अंजना कुंभलकर, सोनाली आचकुलवार यांच्यासह अनेक निराधार महिला व वयोवृद्ध शेतकरी सहभागी झाले होते.



