
१२ मे पासून दोन टप्प्यात आयोजन
गडचिरोली : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत दोन टप्प्यांमध्ये क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दोन टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा १२ मे ते २१ मे आणि दुसरा टप्पा २२ मे ते ३१ मे या दरम्यान आयोजित केला जाईल. जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्प्लेक्स एरिया तसेच क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा स्टेडियम, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी ५.३० ते ८.०० आणि सायंकाळी ५.३० ते ८.०० या वेळेत हे प्रशिक्षण शिबिर चालेल.
या प्रशिक्षण शिबिरात कुस्ती, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, खो-खो, कबड्डी, मैदानी खेळ आणि बॉल बॅडमिंटन यांसारख्या विविध खेळांचे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. १० वर्षांवरील इच्छुक मुले आणि मुली या शिबिरात सहभागी होऊ शकतात.
शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज भरून ११ मे २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे. त्यांनी अधिकाधिक खेळाडूंनी या शिबिरात सहभागी व्हावे, असेही नमूद केले आहे.



