गडचिरोलीविदर्भ

बेडगाव घाटात बिबट्याचा मुक्त संचार ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कुरखेडा : तालुक्यातील बेडगाव घाटात सध्या बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाट परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये दहशतीचे सावट पसरले असून, रात्रीच्या वेळी या घाटातून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास बेडगाव घाटात बिबट्या दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यापूर्वीही या भागात अनेक वेळा बिबट्याची हालचाल दिसून आली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाला याबद्दल सतर्क केले आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार, बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांचा या परिसरात नैसर्गिक अधिवास आहे. बेडगाव घाटाची एकूण लांबी १० किलोमीटर असून, त्यातील २ ते १० किलोमीटरचा भाग वन्यप्राण्यांच्या संचारासाठी संवेदनशील मानला जातो.

या मार्गावरून नियमित प्रवास करणारे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि वनविभागाने केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि एकट्याने प्रवास करणे टाळावे, तसेच लहान मुलांना एकटे सोडू नये, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

बिबट्याचे वाढते दर्शन आणि हालचाल पाहता, वनविभागाने या परिसरात गस्त वाढवावी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button