गोंदियाविदर्भ

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांची कार्यशाळा

संतुलित खत वापर आणि बियाणे निवडीवर मार्गदर्शन

गोंदिया: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते आणि कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी एक कार्यशाळा ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे होते, तर कृषी आयुक्तालयाचे कृषी अधिकारी शाहुराव मोरे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

यावेळी शाहुराव मोरे यांनी खरीप हंगामात खतांचा संतुलित वापर कसा करावा, माती परीक्षण किती महत्त्वाचे आहे, धान बियाण्यांवर बीज प्रक्रिया कशी करावी, किडी व रोगांचे व्यवस्थापन कसे करावे आणि गुणवत्तेच्या निकषांवर बियाण्यांची निवड कशी करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अनधिकृत आणि बनावट खतांची विक्री टाळण्याचे, खतासोबत इतर वस्तूंची सक्तीने विक्री (लिंकिंग) न करण्याचे आणि शेतकऱ्यांना प्रमाणित कृषी निविष्ठा पुरवण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

महाबीजचे प्रतिनिधी सुभाष मेश्राम यांनी ‘साथी’ पोर्टलविषयी सखोल माहिती दिली. या पोर्टलमुळे बियाणे वितरणाची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक कशी होईल, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. सेवासंस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सारस पक्ष्यांचे संवर्धन आणि संरक्षण या विषयावर उपस्थितांना माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी अनुदानित खतांसोबत इतर दुय्यम खतांची लिंकिंग न करण्याबाबत सर्व खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना सक्त सूचना दिल्या. तसेच, पॉस मशीनमधील साठा आणि प्रत्यक्ष साठा यांचा ताळमेळ ठेवणे, विहित नमुन्यात कागदपत्रे जतन करून शेतकऱ्यांना पावती देणे आणि वाजवी दरात कृषी निविष्ठांची विक्री करणे याबाबत सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या.

या कार्यशाळेत आरसीएफ कंपनीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते ई-पॉस मशीनचे वितरण करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वाय.बी. बावनकर आणि मोहिम अधिकारी पी.डी. कुर्वे यांनी या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button