
मृतकांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
सिंदेवाही : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर वाघिणीने केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ पक्षनेते आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी वनविभागाला तातडीने हल्लेखोर वाघिणीचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
शनिवारी दुपारी १२.३० वाजता सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव उपवनक्षेत्रातील चारगाव कक्ष क्रमांक २५२ येथे ही दुर्दैवी घटना घडली. मृत झालेल्या कांता बुधाजी चौधरी (वय ६५), शुभांगी मनोज चौधरी (वय २८) आणि रेखा शालिक शेंडे (वय ५०) या तिन्ही महिला सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील रहिवासी होत्या. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी रविवारी मेंढामाल येथे मृत महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी उपस्थित वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलीस निरीक्षक राठोड आणि गावकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी आमदार वडेट्टीवार यांनी वनविभागाला हल्लेखोर वाघिणीचा त्वरित बंदोबस्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, या दुर्दैवी घटनेचा गांभीर्याने विचार करून मृतकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला वनविभागाच्या सेवेत सामावून घेण्याची आणि मृतांच्या कुटुंबीयांना देय असलेला आर्थिक मोबदला तातडीने देण्याची सूचनाही त्यांनी केली. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज त्यांनी यावेळी वन अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.
याप्रसंगी सिंदेवाही काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, सिंदेवाही नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, मेंढामाल काँग्रेस कमिटी शाखाध्यक्ष वामनराव कोकोडे, गुरुदास बोरकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार आणि नथूजी सोनुले आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



