
गडचिरोली : जिल्ह्यातील गावांमध्ये अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ महिला गाव संघटनेच्या प्रयत्नांना यश येत आहे. देसाईगंज तालुक्यातील उसेगाव, चोप आणि शंकरपूर येथे चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर महिलांनी मुक्तिपथ आणि पोलीस विभागाच्या मदतीने धडक कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी चार दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उसेगाव येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच गावच्या पोलीस पाटील, मुक्तिपथ टीम आणि महिला एकत्र आल्या. त्यांनी अहिंसक मार्गाने कारवाई करत तीन बोरे मोहफुलाचा सडवा आणि १२० देशी दारूच्या टिल्लू जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, यापुढे जर दारूविक्री करताना आढळल्यास शासकीय दाखले, कागदपत्रे आणि शासकीय योजना बंद करण्याची तसेच ग्रामसभेच्या ठरावानुसार दंडात्मक कारवाई करण्याची ताकीद संबंधितांना देण्यात आली आहे.
चोप गावात केलेल्या तपासणीत पाचपैकी दोन दारू विक्रेत्यांकडे अवैध दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडून ३८ आणि ५ देशी दारूचे टिल्लू जप्त केले आणि दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. या कारवाईदरम्यान गाव संघटनेच्या महिला, गावातील पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. शंकरपूर गावात अवैध दारूविक्री बंद असतानाही एका विक्रेत्याने पुन्हा विक्री करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच सतर्क महिलांनी तातडीने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी या विक्रेत्यावरही कायदेशीर कारवाई केली. या कारवाईत गाव संघटनेच्या सर्व सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि चार ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते.
या तीन गावांतील महिलांच्या एकजुटीमुळे आणि मुक्तिपथच्या सहकार्यामुळे अवैध दारूविक्रीवर लगाम लावण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे इतर गावातील अवैध दारू विक्रेत्यांनाही कठोर संदेश गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात महिला आता अवैध धंद्यांविरुद्ध अधिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.



